इंधन दरवाढ; सलग तिसऱ्या दिवशी किंमती आहे ‘ आहे तशीच ‘

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. २ : पेट्रोलियम कंपन्यांच्या दर पत्रकानुसार गुरुवारी मुंबईत पेट्रोलचा भाव प्रती लीटर ८७.१९ असून डिझेल दर ७८.८३ रुपयांवर कायम आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८०.४३ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८०.५३ रुपये प्रती लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल ८३.६३ रुपये आणि कोलकात्यात ८२.१० रुपये झाले आहे. चेन्नईत डिझेल ७७.७२ रुपये आणि कोलकात्यात ७५.६४ रुपये झाले आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ४० डॉलर प्रती बॅरल आहे. त्यात मंगळवारी १.५ टक्क्याची वाढ झाली. तर ब्रेंट क्रूडचा भाव ४१ डॉलर प्रती बॅरल होता. मार्च महिन्यात कच्च्या तेलाचा भाव शून्याखाली गेला होता. मात्र देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी ८३ दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले होते.

लॉकडाउन शिथिल होताच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवण्यास सुरुवात केली होती. ७ जूनपासून कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला होता. मागील २३ पैकी २२ दिवस कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. या दरवाढीने दिल्लीत प्रथमच पेट्रोलच्या तुलनेत डिझेल महाग झाले. डिझेलचा भाव ८० रुपयांवर गेला. तर मुंबईत पेट्रोल ९० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. सोमवार वगळता मागील पाच दिवसांपैकी चार दिवस इंधन दरात कोणतीही वाढ झालेली नाही. यामुळे तूर्त जनतेला दिलासा मिळाला आहे. लॉकडाउनमुळे इंधन विक्रीत प्रचंड घट झाली. १६ मार्च ते ५ मे दरम्यान देशातील पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर होता. य़ा दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमची वाढत होत्या.हा तोटा भरुन काढण्यासाठी तेल वितरक कंपन्यांनी आता इंधन दर वाढीचा सपाटा लावला आहे. मागील दोन महिन्यांतील नुकसान भरून काढण्यासाठी आणखी काही दिवस पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

टाळेबंदीने सरकारचा जीएसटी आणि इतर कर महसूल आटल्याने आता इंधन विक्रीतून जास्तीत जास्त कर वसूल करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपन्यांनी विमान इंधनाच्या दरात देखील वाढ केली. यामुळे विमान तिकिटाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *