कोरोनावरील लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत शाळा उघडण्याची घाई करू नका ! पालकांची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. २ : जोपर्यंत कोरोनावरील लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत शाळा उघडण्याची घाई करू नका, असा पवित्रा राज्यभरातील पालकांनी घेतला आहे. आता शाळा उघडली आणि विद्यार्थ्यांना काही झाले तर त्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्नही पालकांनी विचारला आहे. बुधवारी पालक संघटनेने आपली भूमिका शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमोर स्पष्ट केली. यामुळे शाळा नेमक्या केव्हा सुरू होणार याबाबत संभ्रम कायम राहिला आहे.

शालेय शिक्षण विभागाने 15 जूनला परिपत्रक काढून नववी व दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू होतील. शालेय शिक्षण सर्व जबाबदारी स्थानिक प्रशासन म्हणजेच जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली आहे. त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा,असे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर पालकांनी बुधवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमोर व्यथा मांडली. विद्यार्थ्यांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. जर विद्यार्थ्यांना काही झाले तर जबाबदारी कोणाची असा प्रश्न पालकांनी शिक्षणमंत्र्यांसमोर उपस्थित केला.

वर्गामध्ये तीन फूट अंतर पाळणे, शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ नसतात तिथे मुलांच्या आरोग्याची काळजी शाळांकडून कशी घेणार? स्कूल बस, व्हॅन आणि ऑटोमध्ये सोशल डिस्टन्सिंग कसे पाळणार? असे प्रश्न उपस्थित करत पालकांनी कोरोनावर लस आल्याशिवाय शाळा सुरू करण्यात येऊ नये असा आक्रमक पवित्रा घेतला. त्याचप्रमाणे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शासनाने वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही मतही पालक संघटना इंडिया वाईड पॅरेंट असोसिएशनकडून मांडण्यात आले.

सर्व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य टीव्ही चॅनेलद्वारे दररोज 3-4 व्याख्याने सुरू करावीत. त्यांचे भाग केंद्रीयपणे पूर्ण करावेत. ही व्याख्याने त्या विषयाच्या चांगल्या शिक्षकांनी घेतली पाहिजेत. जेणेकरून राज्यभरात सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षण मिळेल. सर्व लेक्चर्स रेकॉर्ड करावे आणि वेबसाईटवर उपलब्ध करावीत. यामुळे ऑनलाईन वर्गावर पालकांचा खर्चही कमी होईल असेही पालकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *