महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जुन ।। ससून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागू नयेत यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे सुरू केले आहे. रुग्णांना बाहेरील औषधे (झिरो प्रिस्क्रिप्शन ) लिहून देऊ नये, असा आदेश डॉक्टरांना देण्यात आला आहे. अत्यावश्यक औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी औषध खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ‘ससून’मध्ये येणाऱ्या रुग्णांना आता बाहेरून औषधे आणावी लागणार नाहीत, असा दावा प्रशासनाने केला आहे.
रुग्णालयात सर्व प्रकारची औषधे मिळत नाहीत, अशा तक्रारी काही दिवसांपूर्वी रुग्णांनी केल्या होत्या. एका निवासी डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणायला सांगितल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. या घटनेनंतर ‘ससून’मध्ये औषधे का मिळत नाहीत आणि डॉक्टर बाहेरील औषधे का लिहून देतात, असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे आता रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधे लिहून द्यावीत; तसेच बाहेरील औषध आणा अशी चिठ्ठी रुग्णांना लिहून देऊ नये, असा आदेश प्रशासनाने दिला आहे.
औषध खरेदीचा निर्णय
रुग्णालयातच औषधे मिळावी यासाठी औषध खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काही औषधांचा पुरवठा झाला आहे. तर काही औषधांचा पुरवठा येत्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.