Devendra Fadanvis: ‘राज्यातील सर्व टोलवर चारचाकी वाहने टोलमुक्त’; देवेंद्र फडणवीसांचा दावा अन् मनसेचा हल्लाबोल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर | राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून टोलदरवाढीवरून मनसे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आता मुलुंड-ठाणे टोलदरवाढीवरून मनसे नेते अविनाश जाधव यांनी आमरण उपोषण सुरू केलं. ४ दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट दिली. त्यानंतर अविनाश जाधव यांच्याशी चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्यास भाग पाडले. त्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्र या भाजपा-शिवसेनेच्या जाहिरनाम्यावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर राज ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दावा केला आहे. सध्या त्यांच्या या दाव्याची चर्चा सुरू आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आम्ही जी घोषणा केली होती, त्यानुसार राज्यातल्या सर्व टोलवर फॉर व्हिलर किंवा छोट्या गाड्यांना आपण टोलमुक्त केले आहे. केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो, राज्य सरकारकडून पैसे दिलेले आहेत असा दावा फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व टोलवर खरंच चारचाकी वाहनांकडून टोल घेतला जात नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी फडणवीसांचं वक्तव्य अर्धसत्य असल्याचं सांगितलं आहे. वेलणकर म्हणाले, २०१५ साली काही टोलनाके बंद करण्यात आले होते, तर काही ठिकाणी चारचाकी वाहनांना सूट देण्यात आली होती. त्यात पुणे-औरंगाबाद रोडवरील टोल आहेत.

https://x.com/mnsadhikrut/status/1711003021021450359?s=20

परंतु सर्वच ठिकाणी चारचाकी वाहनांना सूट देण्यात आलेली नाही. आजही मुंबई-पुणे जुना हायवे, मुंबई प्रवेश एन्ट्री पाँईट(वाशी, दहिसर, ऐरोली, मुलुंड) त्याचसोबतचे MSRDC चे टोलनाके, मुंबई-वांद्रे सागरी महामार्ग, समृद्धी महामार्ग याठिकाणी चारचाकी वाहनांना टोल आकारला जातो असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या टोलमुक्तीसंबधी केलेल्या वक्तव्यावरून मनसेने खोचक टोला लगावला आहे. मनसेनं ट्विट करत म्हटलंय की, टोलमुक्त महाराष्ट्र झाला देखील आणि महाराष्ट्राला कळलं देखील नाही..किती ‘भूल’थापा माराल. खरंच राजसाहेबांनी जे नाव ठेवलं होतं ते अगदी चपखल आहे… भाजपकुमार थापाडे अशा शब्दात फडणवीसांवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *