महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ जुलै ।। ICC’s Team Of T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप 2024चा थरार आता संपला आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे टीम इंडिया संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिली आणि एकही सामना गमावला नाही. रोहित शर्मा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर होता. बुमराहने 15 विकेट घेत प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला. आता आयसीसीने टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी आयसीसीने 6 भारतीय खेळाडूंचा टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये समावेश केला आहे. विशेष म्हणजे अंतिम सामन्यात 76 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला संधी मिळाली नाही. कोहलीला संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नाही आणि अंतिम सामन्यापूर्वी त्याने 7 डावात केवळ 75 धावा केल्या होत्या. मात्र अंतिम सामन्यात तो पूर्णपणे लयीत दिसला आणि त्याने उत्कृष्ट खेळी खेळली.
रोहित शर्मा, रहमानउल्ला गुरबाज, निकोलस पूरन, सूर्यकुमार यादव, मार्कस स्टोइनिस, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, राशिद खान, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, फजलहक फारुकी यांना 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये संधी मिळाली आहे. 12वा खेळाडू म्हणून एनरिक नॉर्खियाला स्थान मिळाले आहे.
ज्या 6 भारतीय खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. या सर्वांनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रोहित शर्माने या स्पर्धेत 257 धावा केल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने तीन अर्धशतकेही झळकावली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 92 धावांची तुफानी खेळी खेळली होती.
सूर्यकुमार यादवने या स्पर्धेत 199 धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण 47 धावा केल्या होत्या. अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या या दोन्ही खेळाडूंनी बॉल आणि बॅटने दमदार कामगिरी केली. हार्दिकने 144 धावा केल्या आणि 11 बळी घेतले. अक्षर पटेलने 9 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे अर्शदीप सिंगने 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या.