महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुलै ।। पुणे, मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणारी बातमी आहे. मुंबई आणि पुणे शहरात मिळणारे दूध आता महाग झाले आहे. गोकुळ दूध संघाकडून पुणे आणि मुंबई या ठिकाणी गाईच्या दूधाचा विक्री दरामध्ये वाढ केली आहे. एक जुलैपासून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी झाली आहे. गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये मोठी मागणी आहे. पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात कोणतीही वाढ नाही.
जून महिन्याच्या सुरुवातीला मदर डेअरीकडून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ करण्यात आली होती. तर अमूलने देखील आपल्या दूध दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर कर्नाटक मिल्क फेडरेशनकडून नंदिनी या दुधाचे दर वाढवले होते. आता गोकुळने दुधाच्या दरात वाढ केली आहे.
मुंबई आणि पुणे शहरात मिळणारे गोकुळचे दूध महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलडणार आहे. आता दुधासाठी त्यांना जास्त खर्च करावा लागणार आहे. वाढता खर्च आणि दूध पावडरीमध्ये होणाऱ्या तोट्यामुळे दर वाढ केली असल्याचे सांगितले गेले. या दरवाढीमुळे उत्पादक आणि संघाला हातभार लागणार आहे. पुणे, मुंबईत गाईच्या दुधाची विक्री याआधी प्रतिलिटर ५४ रुपये दराने होत होती. आता हा दर प्रतिलिटर ५६ रुपये असा झाला आहे.