महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। जून महिन्यात पावसाने चांगला जोर धरला नव्हता. पण जुलै महिना सुरू होताच राज्यात मान्सूनमध्ये पुन्हा एकदा बळकटी येत आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहणार असून पुढील ७२ तासांत काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD Weather Alert) व्यक्त केला आहे.
यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना यलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आलाय. हवामान खात्याने गुरुवारी आणि शुक्रवारी देखील राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला नसला, तरी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या.
आज कोणकोणत्या भागात कोसळणार पाऊस?
आयएमडीच्या अंदाजानुसार, आजपासून ९ जुलैपर्यंत मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, जिल्ह्यात चांगला पाऊस (Rain Updates) कोसळेल. कोकणातही पावसाचा जोर वाढणार असून घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील दोन दिवस पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain Updates) आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय. नाशिक, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस चांगला पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.