महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। हिंग हा एक असा मसाला आहे, जो डाळींपासून ते भाज्यांपर्यंत प्रत्येक पदार्थाला चांगली चव देतो. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात या मसाल्याशिवाय कोणतेही अन्न पूर्ण मानले जात नाही. पण, तुम्हाला माहीत आहे का की, हिंग डाळी आणि भाज्यांची चव तर वाढवतोच; पण याचा आरोग्यालाही भरपूर फायदा होतो. हिंगामध्ये असलेले पोषकतत्त्व आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि आवश्यक आहेत. त्याच्या वापराने अनेक गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवता येते. हिंगाचे नियमित सेवन केल्यास अनेक आजारांवर मात करता येते, असे तज्ज्ञ सांगतात. जाणून घेऊया याचे फायदे…
पचन समस्या
हिंग पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे गॅस, अपचन आणि पोटदुखी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. हिंगाचे सेवन केल्याने पाचक एंझाइम अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे अन्नाचे पचन सुधारते.
अॅसिडिटी आणि गॅस
ऋतू कोणताही असो, अॅसिडिटी आणि गॅसची समस्या सामान्य आहे. एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर हिंग मिसळून प्यायल्याने आम्लपित्त आणि गॅसपासून आराम मिळतो.
सर्दी आणि खोकला
हिंगातील अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म सर्दी आणि खोकल्याच्या उपचारातदेखील मदत करतात. गरम पाण्यात हिंग मिसळून प्यायल्याने घसादुखी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
मासिक पाळीच्या वेदना
हिंगामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे मासिक पाळीच्यादरम्यान वेदना आणि पेटके दूर करण्यास मदत करतात. कोमट पाण्यात हिंग टाकून सेवन केल्याने मासिक पाळीत येणार्या वेदनांच्या समस्यांपासून आराम मिळतो.
‘ही’ खबरदारी घ्या
हिंग आरोग्यासाठी फायदेशीर असले, तरी त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. कारण, त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या यासारख्या समस्या उद्भवू शकतात. गरोदर महिला आणि लहान मुलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हिंगाचे सेवन करावे. वेगवेगळ्या ऋ तूंमध्ये चिमूटभर हिंग वापरून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता आणि तुमचे आरोग्य सुधारू शकता.