महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या योजनांसह नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-पिंक रिक्षा योजनेचा विस्तार करण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यात ५०० ई-पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, यासह विविध घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केल्या. अजित पवारांनी ‘फेक नरेटिव्ह’च्या मुद्द्यावरून विरोधकांवर टोलेबाजी केली.
अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी वरील घोषणा केली. अजित पवार म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पात २० हजार ५१ कोटींची महसुली तूट दिसत असली तरी वर्षाखेरपर्यंत खर्चावर नियंत्रण आणून ही तूट कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यावरील कर्जाच्या बोज्यात १०.६७ टक्क्यांची वाढ होऊन, तो आता ७ लाख ८२ हजार ९९१ कोटी रुपये इतका आहे. तरीही विविध कल्याणकारी योजना, व्याज, वेतन आणि निवृत्तीवेतन या सगळ्यांसाठीही तरतूद करावी लागते. कर्ज दिसत असले तरी स्थूल उत्पन्न जसे वाढेल, तसे कर्ज योग्य मर्यादेतच आहे; पण विरोधकांचा यात ‘फेक नरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.