नार्वेकर कुणाची विकेट काढणार? शिंदे, अजित पवार गटांत धाकधूक वाढली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जुलै ।। राज्य विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात कायम राहिल्याने आता नेमका कुणाचा उमेदवार पडणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. मिलिंद नार्वेकरांनी उमेदवारी मागे न घेण्याचा निर्णय घेतल्याने एकनाथ शिंदे अथवा अजित पवारांच्या गटाला फटका बसणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या गटांत धाकधूक वाढली आहे.

विधान परिषदेसाठी विधानसभा सदस्यांकडून निवडून द्यावयाच्या ११ उमेदवारांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले होते. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी यापैकी कुणीही माघार न घेतल्याने आता १२ जुलैला ११ जागांसाठी मतदान होणार, हे निश्चित झाले आहे. पहिल्या फेरीत विजयासाठी २३ मतांचा कोटा निश्चित केला आहे. महायुतीत भाजपने पाच, शिवसेना (शिंदे) गटाने दोन, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने दोन, तर महाविकास आघाडीत काँग्रेसने एक, शिवसेना ‘उबाठा’ने एक, तर शेकापने एक उमेदवार रिंगणात उतरविला आहे- काँग्रेसकडे ३८ मते आहेत. त्यांच्यातर्फे २५ ते २६ मतांचा कोटा उमेदवार प्रज्ञा सातव यांच्यासाठी राखून ठेवला जाऊ शकतो. शिवसेने (उबाठा) कडे १५ मते आहेत- त्यांना विजयासाठी ८ मतांची गरज आहे- मात्र ‘मविआ’चे तिसरे उमेदवार जयंत पाटील यांना ही अतिरिक्त मते देण्यात यावीत, असा आग्रह शरद पवारांचा आहे- जयंत पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द देताना पवारांनी ठाकरे गट आणि काँग्रेस यांना विश्वासात घेतले नसल्याची या दोन्ही पक्षांची तक्रार आहे. तसेच शिवसेना (उबाठा) गटही जयंत पाटील यांच्यावर तीव्र नाराज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *