महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – ता. ०६ : आधीच कोरोना, त्यात पावसाळी आजारांचा भरणा, अशी स्थिती पिंपरी चिंचवड शहरात निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू असून, जुलाब उलट्यांचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका वैद्यकीय विभागाने खासगी दवाखाने व रुग्णालयांकडून कॉलरा, टायफाईड, गॅस्ट्रो, जुलाब, उलट्या, कावीळ झालेल्या रुग्णांची माहिती मागवली आहे. रुग्णांची नोंद ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. अशी धक्कादायक स्थिती शहरात असताना आता पावसाळ्यामुळे नवीन संकट उभे राहिले आहे. जलजन्य आजारांचे. अनेकांना जुलाब, उलट्यांचा त्रास होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर कॉलरा, टायफाईड, गॅस्ट्रो, जुलाब, उलट्या, कावीळची लागण झालेल्या रुग्णांची माहिती कळवावी, असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागाने केले आहे.
महापालिका अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केलेल्या आवाहनानुसार…
नागरिकांनी नळाचे पाणीच पिण्यासाठी वापरावे
बोअरवेल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरींचे पाणी पिऊ नये
शिळे व उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत
वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देऊन पालन करावे
घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा
उलट्या, जुलाब, ताप असल्यास त्वरित उपचार घ्यावेत
पाणी उकळून प्यावे
बांधकाम व्यवसायिकांसाठी…
लेबर कॅम्प किंवा मजुरांसाठी नळाचे पाणी वापरावे
मजुरांना जलजन्य आजार होऊ नयेत, याची काळजी घ्यावी
डॉक्टरांसाठी…
सर्व खासगी डॉक्टर अर्थात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी उपचारास आलेल्या रुग्णांची नोंद ठेवावी
कॉलरा, टायफाईड, गॅस्ट्रो, जुलाब, उलट्या, कावीळ रुग्णांची माहिती महापालिकेच्या नजिकच्या दवाखान्यात किंवा रुग्णालयात द्यावी