LPG ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी, केंद्रीय मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जुलै ।। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी कोट्यवधी एलपीजी सिलिंडर ग्राहकांना दिलासा दिला आहे. एलपीजी सिलिंडरसाठी ईकेवायसी करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नसल्याचं हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं. इंधन कंपन्या एलपीजी ग्राहकांसाठी ईकेवायसी लागू करीत आहेत जेणेकरून बनावट खाती आणि व्यावसायिक सिलिंडरचे फसवे बुकिंग बंद होईल, असं पुरी म्हणाले. केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांच्या पत्राला उत्तर देताना पुरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर यासंदर्भातील माहिती दिली.

संबंधित गॅस एजन्सीमध्ये हे करण्याची गरज असल्यानं नियमित एलपीजीधारकांची गैरसोय होते, असं सतीशन यांनी पत्रात म्हटले आहे. ही प्रक्रिया आठ महिन्यांहून अधिक काळ सुरू असून योग्य ग्राहकांनाच एलपीजी सिलिंडर मिळावेत, हा यामागचा उद्देश असल्याचं पुरी यांनी स्पष्ट केले.

कशी केली जाते ईकेवायची प्रक्रिया?
‘या प्रक्रियेत एलपीजी डिलिव्हरी कर्मचारी ग्राहकांना एलपीजी सिलिंडर पोहोचवताना ओळखपत्रांची पडताळणी करतात. डिलिव्हरी कर्मचारी त्यांच्या मोबाइल फोनवरील अॅपद्वारे ग्राहकाचे आधार कार्ड कॅप्चर करतात. ग्राहकाला एक ओटीपी मिळतो, जो प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वापरला जातो. ग्राहक आपल्या सोयीनुसार वितरकांशी संपर्क साधू शकतात,” असं पुरी म्हणाले.

स्वत:ही करू शकता ईकेवायसी
एलपीजी ग्राहक आयओसी, एचपीसीएल सारख्या कंपन्यांचे अॅप्स इन्स्टॉल करू शकतात आणि स्वत: ई-केवायसी पूर्ण करू शकतात. ग्राहकांना आश्वस्त करण्यासाठी आणि कोणत्याही योग्य ग्राहकाला त्रास किंवा त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी इंधन कंपन्या या संदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी करत आहेत, असंही पुरी यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *