राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – ता. ०६ : लाॅकडाऊन काळात तब्बल तीन महिने शटर डाऊन झालेला हॉटेल उद्योग लवकरच खुला होणार आहे. हाॅटेल्स व रेस्टारंट चालू करण्यासाठी सलूनच्या धर्तीवर कार्यपद्धती तयार करण्यात येत आहे. त्याचे कठोर पालन हाॅटेल व्यवसायिक व ग्राहकांना करावे लागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक घेतली. त्याला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजयकुमार, पर्यटन प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह हजर होते. दरम्यान, भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. या वेळी वेतन कपात करा, परंतु कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका, असे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले.

टप्प्याटप्प्याने सुरुवात

हॉटेल्स १०० % लगेच सुरू करता येणार नाहीत. पण टप्प्याटप्प्याने, सर्व काळजी घेऊन सुरू करण्याचे नियोजन करत आहोत, असे राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी सांगितले.

हॉटेल व्यावसायिकांचा ६ लाख कोटींचा व्यवसाय बुडाला

विजेची देयके कमी करावीत, हॉटेल्सना औद्योगिक दरात पाणी आणि वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या वेळी हाॅटेल व्यावसायिकांनी केली. तसेच तीन महिन्यांत हाॅटेल व्यावसायिकांचा ६ लाख कोटींचा व्यवसाय बुडाल्याचे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.

कोरोना योद्धा म्हणून पाहावे

शासनाने आमच्याकडे कोरोना योद्धा म्हणून पाहावे. सर्वत्र नोकऱ्या जात आहेत, मात्र आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या घरी चुली पेटलेल्या राहतील याची काळजी घेत आहोत. सद्य:स्थितीत आमच्याकडे ८० टक्के स्थलांतरित कामगार आहेत. आता काही प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्तराँ सुरक्षित अंतर ठेवून सुरू करायला परवानगी द्यावी. गुरुबक्षसिंग कोहली, अध्यक्ष, इंडियन हॉटेल्स असोसिएशन.

स्वयंशिस्त महत्त्वाची

कोरोनावर मात करण्याच्या प्रयत्नात हॉटेल्सनी वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली. कोरोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्त्वाचे आहे. आदित्य ठाकरे, पर्यटनमंत्री

उपलब्ध भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या, पण जुन्यांना घालवू नका : मुख्यमंत्री

जगभरातच कोरोनाच्या कठीण प्रसंगात भलेही काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल, पण कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी उद्योजकांना केले. भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या व्हीसीमध्ये ते बोलत होते. एकीकडे कारखाने परराज्यातील कामगारांची वाट पाहत आहेत, मात्र त्यापेक्षा उपलब्ध भूमिपुत्रांना नोकऱ्या द्या तसेच नव्या नोकऱ्या देताना जुन्या कामगारांना घालवू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *