महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै ।। कोकणात मागच्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोकणातल्या अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला असून हे पूराचे पाणी अनेक गावांमध्ये शिरले आहे. या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीसोबत रेल्वे वाहतुकीवर देखील झाला आहे. या पावसाचा फटका कोकणे रेल्वेला बसला असून अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. एकाच ठिकाणी गाड्या थांबून असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. या पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. कोकण रेल्वेवरील अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. मुंबईहून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन दोन ते अडीच तास उशिराने धावत आहेत. कोकण कन्या एक्स्प्रेस दीड तास उशिराने आहे.मंगळूरू एक्स्प्रेस दोन तास उशिराने आहे. तुतारी एक्स्प्रेस दोन तास उशिराने आहे. तर मडगाव एक्स्प्रेस दोन तास उशिराने धावत आहे. तर मुंबईच्या दिशेने जाणारी मंगला एक्स्प्रेस अडीच तास विलंबाने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.
रायगडमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. उत्तर रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. खालापुरातील सावरोली येथील नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले आहे. रायगडमधून वहाणाऱ्या तीन नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर गुढघाभर पाणी साचले आहे. या पाण्यात एसटी बस बंद पडली त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. खालापूर तालुक्यातील कालोते गावाजवळील ही घटना आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड भिंगळोली एसटी डेपो ते शासकिय रेस्टहाऊस तसेच समर्थ अपार्मेट याठिकाणी पुन्हा पुराचे पाणी शिरल्याने वाहन चालकाना कसरत करावी लागत आहे. रस्ता जलमय झाल्याने वाहन चालवणे चालकांना कठीण झाले आहे. जिल्ह्यात कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात शेती पाण्याखाली गेली आहे तर काही ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, हवामान खात्याने आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.