महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै ।। आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) जनसन्मान मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे जवळपास सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची बारामती तयारी पूर्ण झाली असून साधारणता पंचवीस हजार लोक या मेळाव्याला उपस्थित राहतील असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.
राज्याच्या राजकारणात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट विधानसभेसाठी पुढे सरसावली आहे. आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा पार पडत आहे.
आगामी विधानसभेच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बारामतीमधूनच विधानसभेचे रणशिंग फुंकले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
विधानपरिषदेत विजय
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून आले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत दादांचे आमदार शरद पवार यांच्या बाजूने मतदान करतील, अशी शक्यता होती. मात्र अजित पवार गटाच्या आमदारांनी दादांच्या बाजूने मतदान केले. या विजयामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आत्मविश्वास वाढला आहे.