महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै ।। राज्यात मान्सूनने जोर पकडला असून सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहेत. पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्याने काही शहरांचा पिण्याच्या पाण्याच प्रश्न मिटलाय. तर आज म्हणजेच रविवारी पावसाचा जोर आणखीच वाढणार, अशा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आलाय.
काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी (१४ जुलै) अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची (Maharashtra Heavy Rain) शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.
तर मुंबई, पुण्यासह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम घाटाच्या परिसरातही पावसाचा जोर (Maharashtra Rain News) वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार वगळून सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील ४ दिवस राज्यात पावसाची अशीच परिस्थिती राहणार, असंही सांगण्यात आलं आहे.
सध्या गुजरातच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे. रबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे पश्चिम घाट ओलांडून मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे.