महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुलै ।। पुणेकरांसाठी मोठी बातमी आहे. शहरात झिका रुग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे. तर महिन्याभरात डेंग्यूचे २१६ संशयित रुग्ण आढळले आहेत. पुण्यात झिका पाठोपाठ डेंग्युचा कहर दिसून येत आहे. रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं समोर आलंय. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून स्वच्छता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय.
शहरावर झिकाचं सावट
पुण्यात झिका रुग्णांची संख्या २३ वर पोहोचली (Pune News) आहे. तर राज्यात २५ रुग्णांची नोंद झालीय. कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये झिकाचं सावट आहे. दोन्ही शहरात प्रत्येकी एक रुग्ण तर एकट्या पुणे जिल्ह्यात २३ रुग्ण आढळले आहे. महिला, पुरुष आणि तरुणांचा रुग्णांमध्ये समावेश आहे. मात्र , लहान मुलांना धोका नसल्याचं सांगितलं जात आहे. तर गर्भवती स्त्रियांना धोका कायम आहे. मुदतपूर्व प्रसूतीची देखील शक्यता वर्तविली जातेय.
डेंग्यूच्या रुग्णांत मोठी वाढ
पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतील वाढ समोर आलीय. महिन्याभरात डेंग्यूचे एकूण २१६ संशयित रुग्ण समोर आलेत. त्यात एकाच आठवड्यात तब्बल १५६ रुग्णांची नोंद झालीय. पावसाळ्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होत असल्याचं सांगितलं जात आहे. स्वच्छता बाळगण्याचं आणि डासांपासून बचाव करण्याचं आरोग्य विभागाकडून आवाहन नागरिकांना केलं (Dengue Patients) जातंय. जानेवारीत ९६, फेब्रुवारीमध्ये ७५, मार्च महिन्यात ६४, एप्रिलमध्ये ५१ आणि मे महिन्यात ४४ अशी रुग्णसंख्या समोर आलीय. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यापासून रूग्णसंख्येत मोठी वाढ झालीय. शहरात वर्षभरात डेंग्यूचे ७०३ संशयित रुग्ण आढळले आहेत.
झिकापासून बचाव कसा कराल ?
झिकापासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने नियमावली जाहीर केलीय. घरामध्ये डास होणार नाही, याची काळजी घ्या. घरात स्वच्छता ठेवा. मच्छरदाणीचा जास्तीत जास्त वापर करा. घरात साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नका. घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा. आपल्या परिसरातदेखील स्वच्छता बाळगण्याचं आवाहन झिका (Zika Virus) आणि डेंग्युच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलंय.