पुणेकरांनी नियमांचे पालन करावे ;अन्यथा परत लॉकडाऊनचा प्रशासनाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ‘पुणे शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आगामी काळात प्रशासनाकडून कडक धोरण अवलंबिण्यात येणार असून, राज्य सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे’ असे सांगत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी परिस्थिती आटोक्यात न आल्यास पुणे शहरात पुन्हा टाळेबंदीचा इशारा दिला आहे. पुणे शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतींच्या परिसरात पाचपेक्षा अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन केला जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ, दीपक म्हैसेकर, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, ‘टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिक हे मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत चालली आहे. पुणे शहरात आगामी काळात प्रशासनाकडून कडक धोरण स्वीकारले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.’ पुणे शहरालगत असलेल्या हवेली तालुक्यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली आहेत. या तालुक्यामध्ये ५२७ रुग्ण आहेत. हा भाग ग्रामीण असला, तरी शहरालगत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीच्या परिसरात पाचपेक्षा अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला जाणार आहे’ असे जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.

भरारी पथके नेमणार

‘जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामध्ये हवेली तालुक्याबरोबरच दौंड, मावळ, पुरंदर, खेड या तालुक्यांचा समावेश आहे. मास्क लावणे, सुरक्षित वावर राखणे याबाबतच्या सूचनांचे पालन होत नसल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भरारी पथके नेमून कारवाई केली जाणार आहे’ असे जिल्हाधिकारी राम म्हणाले

होम क्वारंटाइन व्हा !

‘करोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी होम क्वारंटाइन होणे आवश्‍यक आहे. मात्र, सौम्य लक्षणे असतानाही अनेक जण कोविड रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे कोविड रुग्णालयांमध्ये खाटा उपब्लब्ध होत नसल्याने सौम्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी होम क्वारंटाइन करावे‘ असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. याबाबत ते म्हणाले, ’होम क्वारंटाइन होण्याचे प्रमाण हे पुण्यात कमी आहे. देशात आणि राज्यात हे प्रमाण जास्त आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांना उपचारासाठी आवश्यक असणारे किट्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे संबंधित नागरिकांनी होम क्वारंटाइन होणे आवश्यक आहे’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *