महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुलै ।। आर्थिक वर्ष 2023-24 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. त्यामुळे तुम्ही आयटीआर भरला नसेल तर लवकर भरा, अन्यथा दंड भरावा लागेल.
आयकर नियमांनुसार, प्रत्येक वर्षी आयटीआर फाईल करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये येत असाल आणि 31 जुलै या शेवटच्या तारखेपर्यंत आयटीआर फाईल केला नसेल तर तुम्हाला दंड भरून आयटीआर फाईल करावा लागेल. दंडाची रक्कम ही करदात्याच्या वार्षिक उत्पन्नावर असेल. तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर उशिरा आयटीआर फाईल केल्यास एक हजार रुपये दंड द्यावा लागेल. जर तुमचे उत्पन्न पाच लाखांहून जास्त असेल तर त्यासाठी पाच हजार रुपये दंड असेल.
आयकर विभागाकडे अनेक स्रोतांच्या माध्यमातून तुमच्या उत्पन्नाची माहिती पोहोचते. वेळेवर आयटीआर दाखल न केल्यास त्या माहितीच्या आधारे आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवू शकते. नोटिसीच्या त्रासापासून वाचण्यासाठी वेळेवर आयटीआर भरा.