Nashik News : नाशिकात डेंग्यूचा धुमाकूळ ; १५ दिवसांत आढळले तब्बल २०० रुग्ण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जुलै ।। नाशिक शहरात डेंग्यूने अक्षरश: कहर केला आहे. गेल्या १५ दिवसांत शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २०० पार गेली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. डेंग्यूवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागात सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. तरी देखील आरोग्य विभाग डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास अपयशी ठरल्याचं दिसून येतंय.

नाशिक शहरात (Nashik News) जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात डेंग्यूचे ९६ रुग्ण आढळून आले होते. इतक्या प्रमाणात शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळताच आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले. यापार्श्वभूमीवर ठिकठिकाणी तपासणी देखील करण्यात आली.

मात्र, तरी देखील डेंग्यूचे मिळवण्यात आरोग्य विभागाला अपयश आले. डेंग्यू रुग्णांची संख्या कमी होण्यापूर्वी अगदी झपाट्याने वाढली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा शहरात डेंग्यूचे तब्बल १०४ नवे रुग्ण आढळून आले. यात सर्वाधिक २७ रुग्ण सिडको विभागात, २२ रुग्ण नाशिकरोड विभागात आढळून आले.

याशिवाय नाशिक पूर्व आणि पंचवटी विभागात प्रत्येकी १६ रुग्ण, नाशिक पश्चिममध्ये ११ तर सातपूर विभागात १० रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर सध्या सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

दरम्यान, डेंग्यू ताप आल्यानंतर सुरुवातीला रुग्णाला अचानक थंडी वाजून येते. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना जाणवू लागतात. याशिवाय अशक्तपणा, मळमळ, अंगावर सूज आणि पुरळ येणं, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, अशी लक्षणं दिसतात. त्यामुळे ताप आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *