महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जुलै ।। खेड तालुक्यातील दिवाणखवटी येथे नातूनगर बोगद्यासमोर रुळावर दरड कोसळून ठप्प झालेली कोकण रेल्वे वाहतूक २५ तासांच्या अथक परिश्रमानंतर सोमवारी संध्याकाळी सुरू झाली. रविवारी (ता. १४) जुलैला सायंकाळी ६ च्या सुमारास दरड कोसळली होती.
सोमवारी सायंकाळी ४.३० ला लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरळीत झाल्याचे प्रमाणपत्र रेल्वेच्या तांत्रिक टीमकडून देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मांडवी एक्स्प्रेस घटनास्थळावरून रवाना झाली.
कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटीनजीक रेल्वेरुळावर मातीचा भराव आल्याने कोकण रेल्वेमार्ग २४ तासांहून अधिक काळ ठप्प होता. सोमवारी पावसाने उसंत घेतल्यामुळे रेल्वे रुळावरील दरड व चिखल बाजूला करण्याचे काम पूर्ण झाले. अनेक स्थानकांवर गाड्या थांबून ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
मातीचा भराव काढण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले; मात्र त्यासोबत आलेले दगडगोटे, झाडे यांचा समावेश असल्याने काम कठीण होते. भराव तीन ते चार तासांमध्ये हटवला जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, २० तास उलटूनदेखील भराव हटवण्यात यश आले नव्हते.
दिवाणखवटी हा परिसर भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा असल्यामुळे काढण्यात येणारा भराव, चिखल तसेच मुसळधार पावसामुळे डोंगर परिसरातील सैल झालेली माती, पाणी व दगडगोटे पुन्हा-पुन्हा रेल्वेरुळावर येत राहिल्याने भराव वाढतच होता.