महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जुलै ।। पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनामार्फत डेंग्यू डासाच्या अळ्या शोधण्यासाठी शहरातील 72 हजार 767 घरांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1 हजार 701 घरांतील 1 हजार 900 कंटेनरमध्ये या अळ्या आढळून आल्या आहेत. 602 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या असून 242 व्यक्ती/आस्थापना यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामध्ये एकूण 8 लाख 15 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरामध्ये डेंग्यू आजाराच्या निदानासाठी 2 हजार 775 संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये 17 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आत्तापर्यंत स्पष्ट झाले आहे. 7 पुरुष आणि 10 महिला रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे.
बांधकामे, टायर, पंक्चरच्या दुकानांची तपासणी
महापालिका वैद्यकीय आणि आरोग्य विभागाच्या वतीने शहरामध्ये डेंग्यू निर्मूलनासाठी सध्या विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेतंर्गत 245 टायर, पंक्चर आणि भंगार मालाच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. डास अळ्या आढळलेले 13 टायर नष्ट करण्यात आले. त्याशिवाय, 348 बांधकामे तपासली आहेत. 1 हजार 381 कंटेनर मोकळे करण्यात आले. तर, 929 कंटेनरमध्ये अॅबेट टाकण्यात आले. तसेच, विविध 20 दुकाने तपासली आहेत.