महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुलै ।। पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या भाविकांना सुलभ आणि कमीत कमी वेळेत विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता यावे, यासाठी तिरुपती बालाजीच्या धरतीवर पंढरपुरात टोकण दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
आषाढी एकादशीनिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीचे शासकीय महापूजा पार पडली. या महापुजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा मंदिरातील सभामंडपात सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूराच्या विठ्ठल मंदिरासाठी मोठी घोषणा केली.
तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात (Pandharpur News) टोकन दर्शन व्यवस्था करणार, या दर्शन व्यवस्थेसाठी राज्य सरकारकडून तब्बल १०३ कोटींचा निधी देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. लवकरात लवकर हा निधी राज्य सरकारकडून आपल्याला मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभामंडपात दिली.
दरम्यान, टोकण दर्शन व्यवस्थेनंतर आता भाविकांना केवळ दोन तासात विठुरायाचे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे. गोपाळपूर रोडवरील पत्रास शेड या ठिकाणी दर्शन मंडप उभारून टोकण व्यवस्था केली जाणार आहे. सध्या विठ्ठल दर्शनासाठी १७ ते १८ तास लागतात.
टोकन दर्शनाची व्यवस्था सुरू झाल्यानंतर भाविकांना केवळ २ तासांमध्ये लाडक्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे. तिरुपती बालाजीच्या धरतीवर टोकन दर्शन व्यवस्था सुरू होणार असल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे शेतकरी सुख समृद्धी होऊ दे असे आपण विठ्ठल चरणी साकडे घातल्याची यावेळी त्यांनी सांगितले.