महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुलै ।। राज्य सरकारने काही दिवसांपुर्वी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत. दरम्यान लाडका भाऊ योजना का नाही? अशी विचारणा विरोधकांकडून केली जायची. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरातून प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादषीनिमित्त पहाटे पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा केली. यानंतर त्यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. त्यामुळे आता बहिणींसोबत आता भावांच्या खात्यातही पैसे जमा होणार आहेत.
राज्यात शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, कामगारांचं सरकार आहे. हे सरकार सर्वांचं भलं कसं होईल ते पाहतंय. आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये, म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये दिले जातील. तसेच त्यांना दर वर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जातील. या योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
#LIVE | श्री क्षेत्र पंढरपूर | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अजानवृक्ष जलार्पण व माहिती पत्रकाचे विमोचन https://t.co/tvjv0EiLdS
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 16, 2024
लाडक्या भावांसाठी नेमकी योजना काय?
लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला 8 हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत. हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप (Apprenticeship) करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर (कुशल कामगार) तयार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लाडका भाऊ योजनेअंतर्गत, आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे राज्य सरकार पैसे भरेल अशी माहितीही देण्यात आली आहे. अशा प्रकारची योजना आणण्याची इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील आणि त्यांना सरकार स्टायपंड देणार आहे.
मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं
आषाढी वारीचा आज सोहळा आहे. यानिमित्त पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झालीय. पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नीच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. बळीराजा सुखी होऊ दे, पाऊस चांगला पडू दे, सुगीचे दिवस येऊ दे असं साकडं यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठूरायाला घातलं.