महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुलै ।। आषाढी वारी सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 18 लाखांहून अधिक वारकरी भाविक पंढरीत दाखल झाले असून चंद्रभागा नदीच्या तीरावर भक्तांचा महापूर आला आहे की काय तोबा गर्दी दिसत आहे.परंपरागत वारी पोहचती करण्यासाठी आलेल्या वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीचे स्नान, नगर प्रदक्षिणा करण्यासाठी भल्या पहाटे पासून रांगा लावलेल्या दिसत होत्या.
भाविकांची ही लगबग सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहपत्निक श्री विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा केली. पूजेनंतर त्यांनी राज्यातील जनता सुखी समृद्ध राहू दे पुरेसा पाऊस होवू दे असे साकडे घातले. वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शासकीय महापुजेत सहभागी होण्याचा मान बाळू शंकर अहिरे (वय – 55) आणि आशाबाई बाळू अहिरे (वय – 50, रा. अंबासन, ता. सटाणा, जि. नाशिक) या दापत्याला मिळाला.
यावर्षी वारी ही विक्रमी गर्दीची आहे दरवर्षी 10 ते 12 लाख भाविक उपस्थित असतात यावेळी 18 लाखाहून अधिक आहेत.देवाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत 2 लाखाहून अधिक भाविक उभे असून दर्शनासाठी 18 ते वीस 20 लागत आहेत. एक मिनिटामध्ये 30 ते 35 भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्यानबा तुकारामाचा नामघोष करीत आषाढी वारी पोहचती करण्यासाठी आलेल्या लाखो वारकरी भाविकांनी चंद्रभागेचे स्नान, नगरप्रदक्षिणा, नामदेव पायरी, मंदिराचे कळस दर्शन करुन प्रसादाचाही लाभ घेतला.