महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे प्रकरण देशभरात गाजत असताना, तिने नवनवे कारणामे समोर येत आहेत. आता साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये शासकीय रुग्णालय असलेल्या वायसीएमध्ये तळवडे येथील बंद पडलेल्या कंपनीचा पत्ता आणि खोटे रेशन कार्ड सादर केल्याचे समोर आले आहे.
पूजा खेडकरच्या या सर्व प्रतापांमुळे तिच्यावरील कारवाईला सुरूवात झाली असून, आता हे नवे प्रकरण समोर आल्यामुळे तिच्या अडचणी वाढणार आहेत यात शंका नाही.
साम टीव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, “प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटे रेशन कार्ड आणि तळवडेतील बंद पडलेल्या कंपनीचा पत्ता पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात सादर केला होता.
पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिलेल्या पत्त्याची पाहणी करताना तेथे प्रत्यक्षात एक बंद पडलेली कंपनी असल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान अनेक वादांमध्ये सापडलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरचा महाराष्ट्र सरकारचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने तिला तातडीने परत बोलावण्याचे पत्र जारी केले आहे.अकादमीने त्यांना पुढील आवश्यक कारवाईसाठी परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी लिहिलेल्या पत्रात, “अकादमीने खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे आणि पुढील आवश्यक कारवाईसाठी त्यांना परत बोलावण्यात आले आहे,” असे म्हटले आहे.
राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना 23 जुलैपर्यंत LBSNAA ला अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.या वादानंतर पूजाच्या नियुक्तीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात, केंद्राने नुकतेच तिच्या नियुक्तीची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
खेडकरची नियुक्ती आणि इतर तपशीलांची अतिरिक्त सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून छाननी केली जाणार आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडकर दोषी आढळल्यास तिला सेवेतून बडतर्फ केले जाऊ शकते.