बँक ठेवींवर आता ७.३५ टक्क्यांपर्यंत लाभ ! विविध बँकांकडून अतिरिक्त व्याजदराच्या विशेष योजना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील विविध बँकांनी ग्राहकांकडून निधी आकर्षित करण्यासाठी, मुदत ठेवींवर २५ ते ३० आधारबिंदू अतिरिक्त व्याज देणाऱ्या विशेष योजनांची घोषणा केली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेसह, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदाने विशेष ठेव योजनांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ३९९ दिवस ते ४४४ दिवसांच्या मुदत ठेवींवर वार्षिक ७.२५ ते ७.३० टक्के दराने व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त ०.५० आधारबिंदू म्हणजेच अर्धा टक्के अधिक व्याज मिळणार आहे. स्टेट बँक आणि बँक ऑफ बडोदाने अनुक्रमे अमृतवृष्टी, मान्सून धमाका अशा नावांनी या योजना जाहीर केल्या आहेत.

बँकांच्या पतपुरवठ्यात यंदा चांगली वाढ दिसून येत आहे, त्याला अनुसरून बँकांना मोठ्या प्रमाणावर निधीची गरज भासत आहे. ती भागवण्यासाठी बँकांकडून मर्यादित कालावधीसाठी विशेष ठेवी योजनांची घोषणा केली जाते. यामुळे सामान्य ग्राहक बँकांनी वाढवलेल्या व्याजदरांकडे आकर्षित होऊन ठेवींमध्ये वाढ करणे अपेक्षित आहे. विशेषत: रिझर्व्ह बँकेकडून नजीकच्या काळात रेपो दर वरच्या पातळीवर कायम राहण्याची शक्यता असल्याने बँकांकडून ठेवींवर व्याजदर उच्च राहण्याचे संकेत आहेत.

जास्तीच्या लाभाच्या योजना कोणत्या?
बँक योजना कालावधी व्याजदर

स्टेट बँक अमृत वृष्टी ४४४ दिवस ७.२५ टक्के

बँक ऑफ बडोदा मान्सून धमाका ३९९ दिवस ७.२५ टक्के

बँक ऑफ महाराष्ट्र ६६६ दिवस ७.१५ टक्के

युनियन बँक ३९९ दिवस ७.२५ टक्के इंडियन ओव्हरसीज बँक ४४४ दिवस ७.३० टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *