Heavy Rain Alert : राज्यात आजही मुसळधार पाऊस ; हवामान खात्याकडून ९ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुलै ।। मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांवरील पाणीसंकट टळलं आहे. या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान खात्याने आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार (IMD Rain Alert), येत्या २४ तासांत कोकण आणि पश्चिम किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगर तसेच पुण्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील ९ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ऑरेंज अलर्ट (Rain News) जारी करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दरम्यान, हवामान खात्याने आज संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईसह पालघर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत शनिवारी पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस
वरळीसह दादर, परेल आणि दक्षिण मुंबईतील काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि बदलापूरमध्येही पहाटेपासूनच पाऊस पडत आहे. उल्हासनगर अंबरनाथमध्ये अधून मधून जोरदार पाऊस पडत आहे.

ठाण्यात गेल्या १२ तासांत ४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे नवी मुंबईतही पावसाला सुरुवात झाली आहे. पनवेल, सीबीडी बेलापूर, वाशी तसेच दिघार परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज दिवसभर मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *