महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुलै ।। जगातील पहिली CNG मोटारसायकल ग्राहकांसाठी लाँच करण्यात आली आहे, दुहेरी इंधनावर चालणाऱ्या या बाइकची ग्राहकांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. ही बाईक लॉन्च होऊन अवघे काही दिवस झाले आहेत आणि या बाईकचा प्रतीक्षा कालावधी (बजाज फ्रीडम 125 सीएनजी वेटिंग पिरियड) तीन महिन्यांचा झाला आहे.
तुम्ही 1,000 रुपये बुकिंग रक्कम भरून तुमच्या नावावर बाईक बुक करू शकता. देशभरात या बाइकचे बुकिंग सुरू झाले आहे. सीएनजी सिलेंडरबद्दल बोलायचे झाले, तर कंपनीने या बाईकमध्ये सीटच्या खाली सिलेंडर ठेवला आहे.
अहवालानुसार, काही शहरांमध्ये प्रतीक्षा कालावधी एका महिन्यापेक्षा कमी आहे, जसे की मुंबईमध्ये प्रतीक्षा कालावधी 20 ते 30 दिवस आहे. त्याच वेळी, पुण्यातील बाइकसाठी प्रतीक्षा कालावधी 30 ते 45 दिवसांवर पोहोचला आहे आणि गुजरातमध्ये प्रतीक्षा कालावधी 45 दिवसांवरून तीन महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. बजाज सीएनजी बाईकची पहिली डिलिव्हरी पुण्यातील श्री. प्रवीण थोरात यांना करण्यात आली आहे.
या बजाज सीएनजी बाइकचे एकूण तीन प्रकार आहेत, बेस ड्रम व्हेरियंटची किंमत 95,000 रुपये, ड्रम एलईडी व्हेरिएंटची किंमत 1.05 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि टॉप डिस्क व्हेरिएंटची किंमत 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
या बाइकमध्ये 124.5 cc इंजिन आहे जे 9.3bhp पॉवर आणि 9.7Nm टॉर्क जनरेट करते. 5 स्पीड गिअरबॉक्स असलेल्या या बाइकमध्ये 2 लीटरची पेट्रोल टाकी आणि 2 किलोचा CNG सिलेंडर आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाईक एका किलोग्रॅममध्ये 102 किलोमीटरपर्यंत (2 किलोग्रॅममध्ये 200 किलोमीटरपर्यंत) आणि 2 लिटर पेट्रोलमध्ये 130 किलोमीटरपर्यंत धावू शकते.
या CNG बाईकमध्ये LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे जो स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह येतो. या डिस्प्लेवर बॅटरी स्टेटस आणि कॉल आणि मिस्ड कॉल अलर्ट यांसारखी माहिती उपलब्ध असेल. ग्राहकांच्या सोयीसाठी या बाईकला यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.