Heavy Rain Alert :राज्यात अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट ; अतिमुसळधार पाऊस कोसळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जुलै ।। राज्यातील अनेक जिल्ह्यांना रविवारी मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी घरात शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. दरम्यान, आज म्हणजेच सोमवारी देखील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पावसाची परिस्थिती पाहता प्रशासकीय यंत्रणांनी अलर्ट राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यात अतिमुसळधार (Heavy Rain) पावसाचा अंदाज आहे.

त्यामुळे येथे पावसाचा रेड अलर्ट (Vidarbha Rain News) जारी करण्यात आलाय. विदर्भातील काही जिल्ह्यांमधील शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देखील जारी करण्यात आली आहे. नागरिकांनी काम असेल, तरच घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईसह कोकणात देखील पावसाचा जोर (Mumbai Rain Alert) वाढण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून रिपरिप पाऊस सुरू असून रस्ते आणि सखल भागात साचले आहे.

नागरिकांचे घरात सुद्धा पाणी शिरले आहे. याचदरम्यान हवामान खात्याने भंडारा जिल्हात रेड अलर्ट जाहीर केले असून खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केले आहे.

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या वारणा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली असून शिराळा तालुक्यातल्या ऐतवडे खुर्द येथील पूल पाण्याखाली गेला आहे.

पुलावर पाणी आल्याने या ठिकाणी प्रशासनाकडून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शिराळा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा जवळचा संपर्क तुटला आहे. शिराळा तालुक्यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.

पश्चिम तसेच उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच आसापासच्या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *