महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै ।। रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोसरी, दिघी, बोपखेल भागातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. घरातील उपयोगाच्या वस्तूंचे नुकसानही झाले. तर भोसरी एमआयडीसी, शांतिनगरमधील काही भागातील शॉप आणि कंपन्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लघुउद्योजकांचे नुकसान झाले.
भोसरीतील स्थिती
भोसरीतील चक्रपाणी वसाहतीमधील राममंदिर परिसरातील बारा गल्ल्यामधील सुमारे दीडशे घरांमध्ये पाणी शिरले. घरांमध्ये पाणी शिरल्याने घरगुती वापराच्या वस्तूंचे नुकसान झाल्याची माहिती सीमा बेलापूरकर, शरद कांबळे, संतोष हिंगणकर, शिवाजी पाटील, रचना गुप्ता, दिलीप माने, कृष्पाणा पाटील, अण्णा गुळवे, धणू गुळवे, पुरुषोत्तम थेरम आदी नागरिकांनी दिली. येथील रिवर डेल स्कूल आणि श्रीराम विद्यालयही पाण्यामध्ये गेले होते. येथील नाल्यावर काहींनी घरे बांधून नाला बुजविल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
भोसरीतील शांतिनगर, गुळवेवस्ती, आनंदनगर, लोंढे तालिम आदी परिसरात असलेल्या सुमारे दोनशे शॉपमध्ये पाणी शिरल्याने लघुउद्योजकांचे नुकसान झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने नाल्यावर चुकीच्या पद्धतीने भिंत बांधून प्रवाह अडल्यामुळे पाणी शिरल्याची माहिती माजी नगरसेवक संतोष लोंढे, लघुउद्योजिका सविता पांचाळ, अमरजीत सिंग आदिंनी दिली. त्याचप्रमाणे महात्मा फुले शाळेमागील लोंढे आळीतील सुमारे पन्नास घरांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
पुणे-नाशिक महामार्गाजवळील सर्वे क्रमांक ९५ व ९६मधील लांडगेनगरमध्ये १५ शॉपमध्ये ओढ्याचे पाणी शिरल्याने लघुउद्योगांचे लाख रुपयांचे नुकसान झाले.
भोसरीतील बालाजीनगरमधील नाल्याचे पाणी सचिन मेंढे, सागर पवार, रेश्मा घोडके, सूरज सोनवणे, समीर शेख, अदू देवकर, दीपक जावळे, गणेश जाधव, सचिन साबळे, मनिषा पवार, पौर्णिमा खरात, उमेश समुद्रे, सुरेखा यादव, मीना बनसोडे आदींसह सुमारे दोनशे नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महापालिकेने येथील नाल्याची फक्त उंची वाढवली मात्र रुंदी वाढविली नसल्याने अशी परिस्थिती उद्भवल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सरवदे यांनी दिली.
दिघीतील परिस्थिती
दिघीमधील काटेवस्ती, विजयनगर, विनायक पार्क, दिघी गावठाणातील महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज विद्यालय परिसर आदी भागातील कुंडलिक वाळके, अनिल कजारी, निकू सिंग आदींसह वीस नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
घटनास्थळाला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, इ क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, प्रशासन अधिकारी नाना मोरे, मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, माजी नगरसेवक विकास डोळस, निर्मला गायकवाड, चंद्रकांत वाळके, सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड आदिंसह लष्कराच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.
येथील लष्कराच्या जागेमध्ये लष्कराद्वारे दगड रचून भिंत बांधण्यात आल्याने पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडला गेल्याने पावसाचे पाणी भिंतीजवळ तुंबून नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. पाऊस थांबल्यावर पुन्हा भिंत बांधून देण्याच्या अटीवर भिंत तोडण्याची परवानगी लष्करी अधिकाऱ्यांनी दिल्याचे राजेश आगळे यांनी सांगितले. भिंत तोडल्यवर पाण्याचा निचरा झाला.
बोपखेलमधील स्थिती
बोपखेलमधील नदीच्या किनाऱ्याला रामनगरी झोपडपट्टीमध्ये दीड हजार कुटुंबे राहतात. त्यापैकी पंधरा घरांमध्ये तीन ते चार फुटापर्यंत नदीचे पाणी शिरले. महापालिकेने येथील सुमारे शंभर नागरिकांचे महापालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतर केले आहे.
त्याचप्रमाणे शाळेमध्ये नागरिकांना राहण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध असून नागरिकांच्या जेवणाची सोय इस्कॉनद्वारे करण्यात आल्याची माहिती ई क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांनी दिली. त्याचप्रमाणे नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यास यथील आणखी नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
घर आणि परिसरात मैलामिश्रीत पाणी
भोसरी, दिघी, बोपखेलमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्याचप्रमाणे हे पाणी घरातील स्वच्छतागृहामधूनही घरात शिरल्याने घरात आणि बाहेर मैलामिश्रीत पाणी भरले होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना घरांत थांबणेही मुश्कील झाले होते. घरातील शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.