Satara Tourist Spots Closed : पावसाळी पर्यटनाला ब्रेक ! सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जुलै ।। राज्यभरात कालपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर, तसेच जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजही सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा तसेच रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 25 ते 30 जुलै 2024 पर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. आजही हवामान विभागाने सातारा जिल्हयात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामधील धबधबे व पर्यटनस्थळे तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा व भिलार धबधबा तसेच पाटण तालुक्यातील ओझर्ड (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे व कास तलाव तसेच जावली तालुक्यातील ऐकीव या धबधब्यांच्या ठिकाणी विशेषतः मान्सून कालावधीत फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.

याठिकाणी अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये व जिवीत व वित्तहानी होऊ नये याकरिता सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्हयातील वरील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरते स्वरुपात बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *