महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जुलै ।। सध्या सोशल मीडियावर प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा पोस्टर, टीझर, ट्रेलर आणि काही गाणेही सोशल मीडियावर रिलीज झाले होते. येत्या ९ ऑगस्टला हा बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीज होणार होता. पण काही कारणास्तव या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलले आहे. प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावरून दिली आहे.
प्रसाद ओकने चित्रपटामध्ये स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. तर क्षितिज दातेने चित्रपटामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे. हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या पूर परिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
पहिलाच कलाकार
दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची माहिती काही तासांपूर्वीच सोशल मीडियावरून दिली. शेअर केलेल्या पोस्टमध्ये, दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी लिहिलं की, “मंगेश देसाई तू निर्माता म्हणून मोठा होतासच आज माणूस म्हणून पण मोठा झालास.. पाऊस-पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी असताना मी चित्रपट कसा प्रदर्शित करू.. तुझ्या या भावनेचा मी आदर करतो. लवकरच नवी तारीख जाहीर करू…” सध्या चित्रपटाच्या ह्या निर्णयामुळे काही चाहते नाराज झाले आहेत. तर अनेक चाहत्यांनी त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.
“गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता ‘धर्मवीर २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू…” अशी प्रतिक्रिया चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी दिली.