![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जुलै ।। २३ जुलैला अर्थसंकल्पाची घोषणा झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात कमालीची घसरण सुरू आहे. २२ जुलै रोजी सोने ७३,००० तर चांदीची किंमत ८८ हजार ५०० रुपयांवर गेली होती. आज मात्र सोन्याचे दर प्रतिदहा ग्रॅम ६८ हजार ५०० तर चांदी प्रतिकिलो ८२ हजार ५०० रुपयांवर आली.
अर्थसंकल्पानंतर सोने साडेचार हजार तर, चांदी सहा हजारांनी स्वस्त झाली आहेत. दोन्ही धातूंच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. गुरुवारी सुद्धा किंमती घटल्या होत्या. अर्थसंकल्पाचा थेट परिणाम सोने आणि चांदीच्या भावावर दिसून येत आहे.
किंमती कमी होण्याचे कारण काय?
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना सोने, चांदीसह अन्य धातूंवरील सीमा शुल्क कमी करण्याची घोषणा केली होती. सोने, चांदीवरील सीमा शुल्क आता ६ टक्के करण्यात आले आहे.
या घोषणेनंतर सोने, चांदीच्या दरात कमालीची घसरण सुरू आहे. दोन्ही धातूच्या वाढत्या दरांना आता ‘ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे सध्या ग्राहकांना सोने, चांदी खरेदी करण्यासाठी सुगीचे दिवस आहेत.
खरेदीसाठी ग्राहकांना सुवर्णसंधी
अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याचा दर हा ७३ हजार रुपये प्रतिदहा ग्रॅम होता. शुक्रवारी (२६ जुलै) हा भाव ४ हजार ५०० रुपयांनी कमी होऊन तो आता ६८ हजार ५०० रुपये खाली आला. आज सुद्धा सोन्याच्या दरात ३०० रुपये इतकी घट झाली आहे. चार दिवसात सोने स्वस्त झाले आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांना सुवर्णसंधी आहे.
तीन दिवसात भाव गडगडले
तीन दिवसात चांदी ६,००० रुपयांनी स्वस्त झाली. २२ जुलैला चांदीचे प्रतिकिलो भाव हे ८८ हजार ५०० रुपये होते. आज चांदीचा भाव हा ८२ हजार ५०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे एकूणच चांदीच्या दरात सहा हजारांनी घसरण झाली आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी चांदीचे भाव पाच हजार रुपयांनी कमी झाले होते.
