महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जुलै ।। ‘‘आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भारतीय जनता पक्षाने २८८ जागा लढायला हव्यात,’’ असे मत माजी केंद्रीयमंत्री खा. नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. याचा अर्थ ‘शतप्रतिशत भाजप, स्वबळावर भाजप’ हा नारा प्रत्यक्षात आणायला हवा, असे आपले मत आहे काय? असे विचारले असता याबद्दलचा निर्णय आमचे श्रेष्ठी घेतील असे त्यांनी स्पष्ट केले .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपने जास्तीत जास्त जागा लढायला पाहिजेत, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली. लोकसभेतील निकालांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महायुती आणि भाजपने काय करायला हवे? असे विचारले असता ते म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकांना कसे सामोरे जायचे याचा आराखडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नेते आणि खासदारांसमोर उलगडून दाखविला आहे. तो सध्या पक्षांतर्गत कृतीचा विषय आहे. योग्य वेळ येताच तो जनतेसमोर खुला होईलच.’’
महाराष्ट्रात भाजपचे सर्व उमेदवार पाडणार या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या विधानाकडे लक्ष वेधताच ते म्हणाले, की ‘‘ महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघावर प्रभाव पाडू शकेल अशी व्यक्ती सध्या तरी कोणीही नाही. त्यामुळे जरांगे काय बोलतात? त्यावर प्रतिक्रिया देण्यात अर्थ नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग हा आर्थिक सामाजिक शैक्षणिक मागासप्रवर्ग हाच आहे. माझ्या अध्यक्षतेखालील आयोगाने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. घटनात्मक चौकटीत ते दिले जाऊ शकेल. ओबीसींच्या आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जरांगेंचा मार्ग योग्य नाही.’’
फडणवीस एकाकी नाहीत
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिशा सालियनच्या संबंधाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे. त्याकडे लक्ष वेधले असता राणे म्हणाले, ‘‘हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे भाष्य करणार नाही. अनिल देशमुख जामिनावर बाहेर आहेत. ते निर्दोष सिद्ध झालेले नाहीत. शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुणीही काही आरोप केले तर भाजप त्यांच्या पाठीशी आहे. ते एकाकी नाहीत.’’