महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुलै ।। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना आपण वेश बदलून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटण्यासाठी सत्तेत सामिल होण्यापूर्वी जवळपास दहा बैठकांसाठी आले होते असा खुलासा केला. या खुलाश्यावरुन उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी नाट्यसृष्टीचं मोठं नुकसान केल्याचा उपहासात्मक टोला लागवला आहे. पत्रकारांंशी बोलताना अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही फिरकी घेतली.
इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप…
अजित पवारांनी वेश बदलून अमित शाहांना भेटायला यायचो असं विधान केल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी राऊतांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये, “तोंडाला मुखवटे घालून, टोपी घालून भेटायला जायचे. यावरुन यांचं महाराष्ट्रासंदर्भातील कपट किती आधीपासून सुरु होतं, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे,” असं म्हटलं. पुढे बोलताना शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना नाटकामध्ये संधी दिली पाहिजे असं राऊत म्हणाले. “महाराष्ट्राला नाटकाची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राने अनेक मोठेमोठे कलाकार दिले आहेत. श्रीराम लागू, नाना पाटेकर, बालगंधर्व अगदी अलीकडे प्रशांत दामले आपण पाहतो. नाट्यसृष्टीची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. नाट्यसृष्टीनं अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे दुर्लक्ष केलं. यांनासुद्धा यापुढे नाटकांमध्ये सहभागी करुन घेत रंगमंच दिला पाहिजे. इतक्या उत्तम पद्धतीने ते मेकअप करतात. इतक्या उत्तम पद्धतीने चेहरे बदलतात. इतक्या उत्तम पद्धतीने राजकारणातील फिरत्या रंगमंचावर काम करतात,” असं राऊत म्हणाले.
या कलाकारांनी मराठी…
“आता पाहा ना अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून, खोट्या पिळदार मिशा लावून दिल्लीत अमित शाहांना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईमधल्या दिव्याच्या लाईटखाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते. हे लोक बोलत आहे की लोक त्यांना ओळखत नव्हते. म्हणजे किती हुबेहुब मेकअप केला आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. या कलाकारांनी मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटांचं मोठं नुकसान केलं आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना केली आहे.
मी कथा लिहून देतो
“आता खोट्या कथा लिहून एकनाथ शिंदे चित्रपट काढत आहेत लोक. मात्र त्यांनी हे जे काही स्वत:वर नाटक रचलं त्यावर त्यांना लिहिता येत नसेल तर मी उत्तम लेखक आहे. मी लिहितो. मला प्रसंग त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. एकनाथ शिंदे आतापासून वेश बदलून जात नव्हते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ते वेश बदलून अहमद पटेलांना भेटायला जात होते. हे पृथ्वीराज चव्हाण उत्तमप्रकारे सांगू शकतील,” असं सूचक विधान राऊत यांनी केलं.