Paris Olympics 2024 : भारताची आणखी एक खेळाडू फायनलमध्ये; दुसऱ्या शिलेदाराची थोडक्यात संधी हुकली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुलै ।। भारताच्या आणखी एका नेमबाज खेळाडूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. मनू भाकरपाठोपाठ रविवारी नेमबाज रमिता जिंदाल फायनलसाठी पात्र ठरली. भारताच्या रमिता जिंदालने १० मीटर एअर रायफल महिला एकेरीत ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. २० वर्षीय रमिता जिंदाल पात्रता फेरीत ६३१.५ गुणांसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. तिने सर्व सहा सीरिजमध्ये १०० पेक्षा जास्त स्कोअर केला. याच स्पर्धेत भारताची इलावेनिल ही ६३०.७ गुणांसह दहाव्या स्थानावर राहिली. त्यामुळे तिला अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवता आली नाही. (Ramita Jindal news)

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारताची दुसरी फायनलिस्ट म्हणून नेमबाज रमिता जिंदालच्या नावाची नोंद झाली. ती सोमवारी २९ जुलै रोजी किताबासाठी अर्थात पदकासाठी भिडेल. अव्वल आठ स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरत असतात. भारताची रमिता पाचव्या स्थानी राहिल्याने तिला फायनलचे तिकीट मिळाले. दुसरी भारतीय स्पर्धक एलावेनीलचे शेवटचे दोन शॉट चुकल्याने तिला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. एकूणच तिची थोडक्यात संधी हुकली.

दरम्यान, शनिवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय शिलेदार संघर्ष करताना दिसले होते. पण, शूटिंगमधून एक आशावादी बातमी समोर आली. शनिवारी भारताची शूटर मनू भाकर पहिल्या तीनमध्ये येऊन अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. त्यामुळे ती पदकाच्या शर्यतीत कायम राहिली. मनू भाकर मागील २० वर्षांमध्ये वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला नेमबाज आहे. शेवटच्या वेळी १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताच्या सुमा शिरूरने २००४ मध्ये अथेन्स येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *