महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै ।। यंदा श्रावण महिन्याची सुरूवात ५ ऑगस्टला होणार आहे. तर, आषाढी अमावस्या कधी आहे हे आपण जाणून घेऊ. तसेच, या अमावस्येला गटारी अमावस्या देखील म्हणतात. त्याचे कारण काय ते जाणून घेऊ.
यंदा आषाढ आमावस्या ३ ऑगस्टला दुपारी ३ नंतर सुरू होणार असून ती ४ तारखेला साजरी होणार आहे. सर्व अमावस्यांमध्ये आषाढ अमावस्येला महत्त्वाचे स्थान आहे. कारण, या दिवशी दीप पूजन असते. आणि या अमावस्येनंतर श्रावणालाही सुरूवात होते. (Gatari Amavasya 2024 )
आषाढ अमावस्येचे महत्त्व शास्त्रात विशेष मानले गेले आहे. या दिवशी सकाळी स्नान करून पितरांना तर्पण अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. यानंतर पितरांच्या नावाने दान करावे. या दिवशी गरजू लोकांना कपडे आणि धान्य दान करावे. पितरांना अर्पण करण्यासाठी कुश, काळे तीळ आणि पांढरी फुले वापरणे उत्तम मानले जाते.
आषाढ अमावस्येला गटारी अमावस्या का म्हणतात?
आषाढ अमावस्येपासून पुढे चातुर्मासात मांसाहार किंवा कांदा, लसूण असे पदार्थ खाण्यातून वर्ज्य केले जातात. यामागचं शास्त्रीय कारण असं की पावसाळ्याच्या दिवसात अन्नातून आपल्याला काही आजार होऊ नयेत. सात्विक अन्न आपण सेवन करावे यासाठी हे महत्त्वाचे आहे.
या अमावस्येचे मूळ नाव गतहारी अमावस्या असे आहे. चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा अशी प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे. याची सुरुवात याच दिवसापासून करावी असे सांगण्यासाठीचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या म्हणजेच गतहारी अमावस्या.
बोलीभाषेत याला गटारी अमावस्या असे म्हटले जाऊ लागले आणि हाच शब्द पुढे प्रचलित झाला, असे सांगितले जाते. आषाढ अमावस्येला पितरांना शांती मिळावी यासाठी काही उपायही केले जातात. पितरांसाठी नैवेद्य ठेवला जातो. तर सायंकाळी दीव्यांची पूजाही केली जाते.