महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुलै ।। दीड तासाच्या भाषणात अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये एकदाही महाराष्ट्राचे नाव घेतले नाही. आसाम आणि बिहारमध्ये येणार्या महापुरावरच चर्चा करण्यात आली, पण महाराष्ट्रातही महापूर येतात, महाराष्ट्रातही पुराने नुकसान होते, पण याची मात्र चर्चा अर्थमंत्र्यांनी का केली नाही, असा सवाल करीत खासदार विशाल पाटील यांनी संसदेत सोमवारी केंद्र सरकारला जाब विचारला.
खासदार पाटील यांनी सांगलीसोबत महाराष्ट्रातील समस्यांबाबतही रोखठोक मते व्यक्त केली. बिहारमधील सिंचन योजनांसाठी निधी देण्यात आला, पण आमच्या सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विस्तारित म्हैसाळ आणि विस्तारित टेंभू योजनेसाठी निधी देण्याची गरज अर्थमंत्र्यांना का वाटली नाही?, अशी विचारणा त्यांनी केला.
आसाम आणि बिहारमध्ये येणार्या महापुरावरच चर्चा करण्यात आली. पण महाराष्ट्रातील महापुराच्या नुकसानीबाबत कोणतीही चर्चा अर्थमंत्र्यांनी केली नाही. आंध्र प्रदेशातील अमरावती शहरातील महापुरावर चर्चा झाली. त्यांना हजारो कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. पण महाराष्ट्रातही एक अमरावती आहे, त्याबद्दल काहीही बोलले गेले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली होती, घेत आहे आणि घेत राहील, असे सांगून, 37 टक्के कराचा पैसा महाराष्ट्रातून येतो आणि जीडीपीचा 14 टक्के हिस्सा महाराष्ट्र देते. महाराष्ट्राला डावलून देशाचा विकास शक्य नाही. महाराष्ट्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास अशक्य आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली. शेतकरी कर्ज, महागाई, भूमिहीन शेतमजूर, खत-बियाणांवरची सबसीडी काहीच सरकारने दिले नाही. कोणा-कोणाला किती फसवणार, असा सवाल त्यांनी केला.
सांगली स्मार्ट कधी?
सांगली शहरही स्मार्ट सिटीत समावेश होण्याची प्रतीक्षा करते आहे. तो तर झाला नाहीच, पण विमानतळाबाबतही चर्चा नाही, निधी नाही. बिहारमधील सिंचन योजनांसाठी निधी देण्यात आला, पण आमच्या सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विस्तारित म्हैसाळ आणि विस्तारित टेंभू योजनेसाठी निधी देण्याची गरज अर्थमंत्र्यांना का वाटली नाही, असा सवालही खासदार पाटील यांनी केला.