![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २५ जानेवारी | खंबाटकीचा घाट म्हणजे पुणे–साताऱ्याच्या प्रवाशांसाठी वर्षानुवर्षे चाललेली एक तपश्चर्या होती. वळणावर वळण, चढावर चढ, आणि मध्येच एखादा ट्रक आजारी पडला की अख्खा घाटच तापाने फणफणायचा! लग्नाची वरात असो की रुग्णवाहिका—सगळ्यांना घाटासमोर नतमस्तक व्हावंच लागायचं. चालक स्टिअरिंग पकडून बसायचा, प्रवासी देवाचं नाव घ्यायचे आणि वाहन हळूहळू ‘चालतंय की सरकतंय’ या संभ्रमात पुढे जायचं. पण आता? आता खंबाटकीचा घाट निवृत्त झाला आहे. हातात पेन्शन, पायात चपला आणि इतिहासाच्या वहीत नाव! कारण जून २०२६ पासून बोगदा येतोय—आणि तोही असा की ४५ मिनिटांचा घाट थेट ७ मिनिटांत गुंडाळून टाकणारा.
हा बोगदा म्हणजे केवळ सिमेंट-काँक्रीटचा चमत्कार नाही; तो महाराष्ट्राच्या संयमावरचा विजय आहे. घाटातली ‘एस’ वळणं, जी अपघात घडवण्यात एम.ए. झालेली होती, ती आता थेट बेरोजगार होणार. वाहनं चढण चढणार नाहीत, चालकांची नस चढणार नाही आणि प्रवाशांची बीपीही नियंत्रणात राहील. सहा पदरी बोगदा, प्रकाश, हवा, सीसीटीव्ही, आपत्कालीन मार्ग—म्हणजे गाडी चालवताना आता “देवा रे देवा” म्हणायची गरज नाही; फक्त हॉर्न वाजवायचा आणि पुढे जायचं. वरून दरीपूल, खाली भुयारी मार्ग—स्थानिक माणूसही खुश, महामार्गही खुश आणि पेट्रोल पंपवाल्याचं मात्र थोडंसं दुःख!
खंबाटकीचा हा प्रकल्प म्हणजे आधुनिकतेचा शालजोडा नेसलेला महाराष्ट्र. तीन वर्षांचा उशीर झाला, हो—पण काही पदार्थ उशिरा शिजले की चव वाढते, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आता घाटात अडकून बसलेले किस्से, ड्रायव्हरचे शिव्याशाप आणि प्रवाशांचे उसासे—हे सगळं भूतकाळात जमा होणार. पुढच्या पिढीला सांगताना म्हणावं लागेल, “आम्ही घाट चढायचो रे!” आणि ती हसून म्हणेल, “घाट? तो काय असतो?” खंबाटकीचा बोगदा म्हणजे रस्त्याचं काम नाही; तो म्हणजे वेळेवर मात करणारा, संयमाला सुटका देणारा आणि प्रवासाला प्रतिष्ठा देणारा प्रयोग आहे. घाट गेला… आणि महाराष्ट्र एक पाऊल वेगाने पुढे गेला!
