महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ ऑगस्ट ।। महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील भारतीय जनता पक्षातील मुख्य चेहरा म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस होणार भाजपचे अध्यक्ष?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याचे उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे मुख्य नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तसेच भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतही उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले होते. इतकेच नव्हेतर पहिल्या रांगेत स्थान दिले होते, ज्यानंतर या चर्चा सुरू झाल्या आहेत.
लवकरच घोषणा होण्याची शक्यता
भाजपचे सध्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावले जाण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही फडणवीसांच्या नावाला संमती दर्शवली असून यासंदर्भात काही दिवसात अधिकृत घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस हे राज्यातील भाजपचे मुख्य नेते म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशा पदांवर काम करत त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. तसेच राज्यातील सत्तानाट्य, राजकीय कुरघोड्यांमध्ये देवेंद्र फडणवीस माहिर आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नव्हते.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पदावरुन मुक्त करण्याची मागणी करत पक्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. दरम्यान, याबाबत नेमका काय निर्णय होणार? फडणवीसांची अध्यक्षपदी वर्णी लागणार का? याबाबतचे चित्र काही दिवसात स्पष्ट होईल.