leftover Roti Health Benefits : नेमकी कोणी खावी शिळी पोळी, चपाती याची माहिती आहे का तुम्हाला?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ ऑगस्ट ।। भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये पोळी, भाकरी या आणि अशा प्रकारच्या कार्बोदकेयुक्त पदार्थांना अधिक प्राधान्य दिलं जातं. तंतुमय घटकांसह लोह आणि इतरही पोषक द्रव्यांचा शरीराला पुरवठा करणाऱ्या या पदार्थांना अनेक भारतीय कुटुंबांच्या दैनंदिन आहारामध्ये स्थान दिलं जातं. अनेकदा तर पोळी किंवा भाकरीशिवाय जेवणाचं ताट अपूर्णच समजलं जातं.

अनेकदा ज्यावेळी संपूर्ण कुटुंबासाठी जेवण बनतं तेव्हा ते प्रमाणाहून जास्त तयार केलं जातं, शिळं अन्न खाऊन संपवणं किंवा त्यांचा कल्पकतेनं पुनर्वापर करत चवीष्ट पदार्थ तयार करणं अशा शकलाही अनेक भारतीय स्वयंपाकघरांमध्ये लढलवल्या जात असल्याचं पाहायला मिळतं. चपाती किंवा पोळीच्या बाबतीतही तेच. शिळी पोळी अनेकांच्याच आवडीची. पण, काही घरांमध्ये मात्र ही शिळी पोळी किंवा चपाती फेकून दिली जाते. पण, याच शिळ्या चपातीचे फायदे किती आहेत तुम्हाला माहितीये?

जाणून आश्चर्य वाटेल, पण ताज्या चपातीपेक्षा शिळी चपातीच अधिक फायद्याची असते. पण, चपाती नेमकी किती शिळी आहे, ही बाबही इथं अतिशय महत्त्वाची. तज्ज्ञांच्या मते 10-12 तासांपूर्वी तयार केलेली पोळी खाणं फायद्याचं. ज्यावेळी चपाती अधिक वेळासाठी ठेवली जाते तेव्हा त्यात आरएस घटक म्हणजेच रेसिस्टंस स्टार्च वाढून या घटकाचा शरीराला फायदा होतो. राहिला मुद्दा शिळी चपाती नेमकी कोणी खावी? यासंदर्भातला तर तेसुद्धा जाणूनच घ्या…

पोटाचे विकार – पोटाचे विकार असणाऱ्यांसाठी शिळी पोळी अतिशय फायदेशीर ठरते. या पोळीच्या सेवनामुळे अपचन, गॅस, पोट फुगण्याची समस्या यांवर तोडगा निघतो. त्याशिवाय पचनक्रियाही सुधारते.

मधुमेह – शिळ्या चपातीच्या सेवनाचा मधुमेहींना फायदा होतो असं तज्ज्ञ सांगतात. या व्याधीनं ग्रासलेल्यांसाठी रेजिस्टंस स्टार्च अतिशय महत्त्वाचा घटक असून तो या शिळ्या चपात्यांमध्ये आढळतो. यामुळं शरीरातील इन्सुलिनची पातळीसुद्धा नियंत्रणात राहते.

शिळ्या चपातीचे अनेक पदार्थ बनवून ती अधिक चवदार पद्धतीनंही खाता येते. चपातीचा चिवडा, तूप- गुळ मिसळून गेलेला चपातीचा लाडू, चपातीचा रोल अशा प्रकारे ही शिळी पोळी अधिक चवदार पद्धतीनं खाल्ल्यास जिभेचे चोचलेही पुरवता येतात आणि शरीराला पोषक तत्त्वांचा पुरवठासुद्धा होतो.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून आहारविषयक बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *