महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट ।। कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील साखर उत्पादक क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीचा फटका साखर वाहतुकीला बसू लागला आहे. त्यामुळे साखरेची वाहतूक प्रभावित झाली असून आवक थांबली आहे. त्यात राज्यामध्ये कमी उत्पादन, वाढती मागणी आणि इतर घटकांमुळे साखर महागली आहे. सणासुदीच्या हंगामात साखरेच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
देशात साखरेच्या भावात वाढ होत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तसा कल दिसत आहे. आठ दिवसांत साखरेच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांची वाढ झालेली आहे. साखर किरकोळ बाजारात ४५ ते ४६ रुपये किलो झालेली आहे.
आगामी काळात आणखी तीव्र वाढ होण्याची अपेक्षा आहे. साखर उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या मते, सरकारने साखरेच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवल्यामुळे आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे साखरेचा दर वाढला आहे. याचा सर्वसामान्य ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर परिसरात पावसामुळे साखरेच्या ट्रकमध्ये लोडिंग होत नसल्याचे साखरेची टंचाई निर्माण झालेली आहे. परिणामी, काही व्यापाऱ्यांकडून अधिक दरात विक्री सुरू असल्याचेही सांगण्यात येते. केंद्र सरकारने ऑगस्टसाठी २२ लाख टन साखरेचा कोटा खुल्या बाजारात विक्रीसाठी जाहीर केला आहे.
यात जुलैमधील शिल्लक दीड लाख टन साखर मिळविल्यास २३ लाख ५० हजार टन साखर खुल्या बाजारात ऑगस्टमध्ये उपलब्ध राहणार आहे. एक ऑक्टोबरपासून नवा साखर हंगाम सुरू होत असताना देशात ७५ लाख टन साखर शिल्लक असेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.