महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट ।। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने मनसेने दोन उमेदवारांची नावे जाहीर करून आघाडी घेतली आहे. शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर पंढरपूरमधील दिलीप धौत्रे यांना संधी देण्यात आली आहे.
राज ठाकरे हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहेत. सोलापूरमध्ये असतानाच राज ठाकरे यांनी पंढरपूरमधून दिलीप धौत्रे यांची उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे, शिवडीमधून अपेक्षेप्रमाणे बाळा नांदगावरकर यांचे नाव समोर आले आहे.
राज ठाकरे यांनी जाहीर केलेले उमेदवार
१. शिवडी विधानसभा- श्री.बाळा नांदगांवकर
२. पंढरपूर विधानसभा – श्री.दिलीप धोत्रे
राज ठाकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. मनसेने लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाठिंबा दिला होता, पण विधानसभा पक्ष एकट्याने लढणार आहे. राज ठाकरेंनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. २२५ ते २५० उमेदवार विधानसभेसाठी उभे केले जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. उमेदवारांची घोषणा करून राज ठाकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.