महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ ऑगस्ट ।। बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला आहे. बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पंतप्रधान हसीना शेख यांनी भारतात पलायन केलं आहे. पंतप्रधान हसीना शेख यांना भारतात आश्रय मिळाल्याने संजय राऊत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. बांगलादेशातील हिंसाचारावरून खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारलाच इशारा दिला आहे. ‘देशात हुकूमशाही करणाऱ्यांना जनता त्यांना माफ करत नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.
बांगलादेश हिंसाचारावरावरून संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. ‘पंतप्रधान संसदेत यायला तयार नाहीत. बांगलादेश पेटला आहे. त्यांनी देशाकडे लक्ष द्यावं. बांगलादेश प्रश्नी सरकारने भूमिका स्पष्ट करावी. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशची निर्मिती केली. लोकशाहीचा मुखवटा लावून देशात हुकुमशाही केली जाते. तिथे जनता त्यांना माफ करत नाही. एवढंच शेख हसीना यांच्याबाबत बोलता येईल’.’शेख हसीना विरोधकांना जेलमध्ये टाकलं, त्यांनी हुकुमशाही पद्धतीने देश चालवला. त्याचा अंत अशा पद्धतीने झाला आहे, असेही ते पुढे म्हणाले.
राजकारण तापणार!
संजय राऊत पुढे म्हणाले, ‘आज उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचत आहेत. पुढील २ दिवसात काही महत्वाच्या गाठीभेटी आहेत. आज काँग्रेसचे काही प्रमुख नेते त्यांना भेटायला येणार आहेत. आज संध्याकाळी ते दिल्लीतील मराठी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. ते मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची देखील भेट घेणार आहेत.
‘महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय खासदारांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ८ तारखेला उपराष्ट्रपती यांनी त्यांना नाश्त्यासाठी बोलावलं आहे. ते तिकडे जातील, असे ते पुढे म्हणाले.
उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर
उद्धव ठाकरे पुढील तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर असणार आहे. उद्धव ठाकरे यांचा पुढील ३ दिवस मुक्काम खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी असणार आहे. संजय राऊत यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. ठाकरे पुढील ३ दिवस अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.