मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार ? ; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्ग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ ऑगस्ट ।। मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलेले आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई ते कोकणचा प्रवास खडतर असतानाच राज्य सरकारने मुंबई-गोवा अंतर कमी करण्यासाठी कोकण एक्स्प्रेस हा प्रकल्प हाती घेतला आहे. एकूण 22 गावांतून हा प्रकल्प जाणार असून यामुळं मुंबई ते गोवा प्रवास 6 तासांत पूर्ण होणार आहे. सध्या रस्तेमार्गे मुंबई-गोवा प्रवासासाठी 12 तास लागतात मात्र कोकण एक्स्प्रेसवेमुळं प्रवाशांना जलद प्रवास करता येणार आहे. तसंच, या महामार्गावर एकूण 14 ठिकाणांहून वाहनांना प्रवेश करता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा प्रकल्प हाती घेतला आहे.कोकणसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा प्रकल्प एकूण 363 किमी लांबीचा असणार असून सहा मार्गिकांचा आहे. त्याची रुंदी 100 मीटर प्रस्तावित करण्यात आली आहे. तर या प्रकल्पासाठी एकूण 68 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अलिबागच्या शहाबाज येथून हा महामार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथपर्यंत जाणार आहे. या महामार्गावर वाहने 100 ते 200च्या वेगाने वाहतील अशापद्धतीने वेग मर्यादा नियंत्रित केली जाणार आहे. कोकणातील 22 गावांतून तर 17 तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. जेथून इंटरचेंज दिला आहे तिथूनच वाहनांना बाहेर पडता येईल व महामार्गावर प्रवेश मिळणार आहे.

अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यांचाही समावेश आहे. अलिबाग तालुक्यातील शहाबाज, रोहा तालुक्यातील घोसळे, माणगाव तालुक्यातील मढेगाव, मंडणगड तालुक्यातील केळवट, दापोली तालुक्यातील वाकवली, गुहागर तालुक्यातील गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील भालवली, देवगड, मालवण, कुडाळ तालुक्यातील चिपी विमानतळ, सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला आणि बांदा या ठिकाणांजवळ इंटरचेंज प्रस्तावित करण्यात आले आहेत.

कोकण एक्स्प्रेसवेसाठी 5792 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यातील 146 हेक्टर वनजमीन या महामार्गात बाधित होणार आहे. यासाठी आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) या प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया सुरू केली आहे. तसंच, कोकण एक्स्प्रेसवेमुळं कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. हा महामार्ग पश्चिम घाटातील इकोलॉजिकल सेन्सिटीव्ह झोन असलेल्या 22 गावांतून हा महामार्ग जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *