महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट ।। गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यामध्ये राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला होता. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सर्वच जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. या मुसळधार पावसानंतर राज्यात अनेक धरणे काठोकाठ भरली असून बहुतांश नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत. या धुवाँधार बॅटिंगनंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे. कसं असेल आजचा हवामान अंदाज? वाचा सविस्तर..
कसं असेल आजचे हवामान?
राज्यामध्ये आता पावसाचा जोर ओसरला असून आज फक्त पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यामध्ये कोकणामधील रायगड जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि वर्धा, तसेच धुळे जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट
त्याचबरोबर आज धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभगाने वर्तवली आहे. तसेच रायगड, सातारा, रत्नागिरीच्या घाटमाथ्यावर पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने या भागांतही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यात जोर ओसरला!
पुणे शहरातही पावसाचा जोर ओसरला असून आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या आठवड्यात पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा पाणीसाठा तयार झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.