महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट ।। विधानसभा निडवणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज ते बीडमध्ये असून बीडमध्ये पोहोचतात राज ठाकरे यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेरलं. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे बराचवेळ गोंधळ निर्माण झाला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून कार्यकर्त्यांना पांगवल्यानंतर राज ठाकरेंचा ताफा पुढे गेला.
जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार होती. याचदरम्यान राज ठाकरे दाखल झाले. त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर हा राडा झाल्याचं पाहायला मिळाल आहे. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यामुळेच हा राडा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या दोन्ही गटात तणाव निर्माण झाला असून पोलीस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
विधानसभेचा आढावा घेण्यासाठी 20 जुलैपासून राज ठाकरे यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. 225 विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत. राज ठाकरे लोकांमध्ये जाऊन समस्या त्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आणि राज्यात तसं काही होणार नसल्याचं विधान केलं होतं. मनोज जरांगे पाटील यांनीही त्यावर टीका केली होती. त्याचा राग मराठा समाजामध्ये आहे.
दरम्यान आज ते बीडच्या दौऱ्यावर आहेत. ते बीडमध्ये येणार असल्याची माहिती शहरातील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी बीड शहरात प्रवेश करताच मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवत घेरलं. जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना तेथून बाहेर काढलं. त्यानंतर परिस्थिती निवळली.