महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट ।। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाकडून स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कालच यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी भेट घेतली. जयंत पाटील आणि शरद सोनवणे यांनी एकत्र जेवण केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जुन्नरमधील जय हिंद महाविद्यालय येथे जेवणासाठी जयंत पाटील थांबले होते. त्यावेळी अचानक या ठिकाणी शरद सोनवणे यांनी उपस्थिती लावली. यामुळे तालुक्यात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. मात्र याबाबत स्पष्टीकरण देताना शरद सोनवणे यांनी सांगितले की, जयंत पाटील आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मागच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये आम्ही एकत्र काम केले आहे. जागतिक आदिवासी दिन असल्याने या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त आम्ही एकत्र आलो होतो. त्यांनी मला बोलावले म्हणून मी जेवायला आलो होतो. असं म्हणत त्यांनी या भेटीमागे कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले आहे.
कोण आहेत शरद सोनवणे?
शरद सोनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले ते मनसेचे एकमेव आमदार होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्ष बदलून शिवसेनेत प्रवेश केला होता, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदेंची साथ दिली.
मागच्या महिन्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जण येण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत गेलेले परभणीतील बडे नेते आणि माजी विधान परिषद आमदार बाबाजानी दुर्रानी यांची भेटही जयंतरावांनी घेतली होती.