महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० ऑगस्ट ।। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. सध्या ते छ. संभाजीनगरमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की, माझा आज दौरा संपला आहे. सोलापूरमधून दौऱ्याची सुरुवात झाली. मराठवाड्या वातावरणाबाबत ऐकून होता. त्याचा स्वत: अनुभव घेतला. माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरवण्यात आल्या आहेत. राज ठाकरे हा मराठा आरक्षणाचा विरोधात आहेत असा खोटा प्रचार करण्यात येत आहे.
माझं स्पष्ट म्हणणं आहे, की महाराष्ट्रासारख्या राज्याला आरक्षणाची गरज नाही. कारण, राज्यात मुबलक सुविधा आहेत. आपल्याला पुरून उरेल इतकं आहे. तरी आपल्याला गरज निर्माण होते कारण बाहेरच्या लोकांना ह्या सुविधा मिळत आहेत. म्हणून आपल्या लोकांना कमी पडत आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
आरक्षण आर्थिक निकषांवर द्यायला हवं असं माझं स्पष्ट मत आहे. पण, सध्या जातीच्या आधारावर राजकारण केलं जात आहे. सध्याच्या दौऱ्याचा मनोज जरांगे पाटील यांच्याशी काहीच संबंध नाही. पण, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हा वाद निर्माण करत आहेत. या सर्वांमागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. यामागे काही पत्रकार देखील आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
गाल आणि पाठ पहावी लागेल
हे सर्व विधानसभेसाठी सुरू आहे. पुढच्या तीन महिन्यात दंगली घडवण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे. पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी सुरू केली, त्यावेली जातीमध्ये द्वेष सुरू झाले. माझ्या नादी लागू नका. माझे मोहोळ उठले तर थांबवता येणार नाही. समाजात विष कालवून राजकरण करू नये. जर तुमचा फडणवीस यांचा विरोध असेल तर तसे बोला समाजात कशाला द्वेष पसरवता? असा सवाल ठाकरे यांनी केला.
सगळ्यांचे एकमत आहे तर आरक्षण देण्यापासून थांबवले कोणी? शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत शब्द का नाही टाकला? जरांगे पाटलांच्या मागे राहून राजकारण केले जात आहे. माझे पोरे काय करतील सांगता येत नाही. घरात जाऊन गाल आणि पाठ पहावी लागेल. तुमचे प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.